देवभूमी रत्नागिरी पुरण कथांचा आधार घ्यायचा झाला तर सारी पृथ्वी दान केल्यानंतर स्वतःला राहण्यासाठी जागा उरली नाही म्हणून परशुरामाने बाण मारून सागर १०० योजने मागे हटवला आणि कोकणची हि देवभूमी निर्माण केली. त्याच कोकणातील एक जिल्हा म्हणजे रत्नागिरी...!

रत्नागिरी म्हटल्यावर आठवतात ते निर्मळ, स्वच्छ, सुंदर समुद्र किनारे व हापूस आंबे, काजू, नारळी, पोफळीच्या बागा ! म्हणूनच पर्यटन दृष्ट्या हा अतिशय महत्वाचा जिल्हा आहे. जिल्ह्यातला जगप्रसिद्ध हापूस आंबा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान अधिकाधिक बळकट करतो आहे.

अमेरिकेच्या अध्यक्षांपासून सर्वांनाच हा आंबा तोंडात बोट घालावयास भाग पाडतो आहे. ह्या आंब्याचे माहेरघर म्हणजे रत्नागिरी. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जन्मभूमी असलेला, स्वातंत्रवीर सावरकरांचे वास्तव्य काही काळ लाभलेला रत्नागिरी जिल्हा. अनेक कलाकरांचे अनुभवविश्व समृद्ध करणाऱ्या या जिल्ह्यात समुद्र किनाऱ्यासह थिबा प्यालससारखी पर्यटनस्थळे आहेत. दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथूनच कार्यरत आहेत.

जिल्ह्यातील दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे (१९३६) हि आधुनिकतेची साक्ष देणारी बाब आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर देशात तिसऱ्या तर राज्यात पहिल्या क्रमांकाचे आहे. या सर्व वैशिष्ट्यांसह रत्नागिरीने आज राज्यात आपले महत्वाचे स्थान निर्माण केले आहे.

जिल्ह्याची लोकसंख्या :
अं.क्र. शीर्षक माहिती
१. जिल्हाची लोकसंख्या 1615069
२. दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या ११२२
३. स्त्रिया ८५३९४८
४. पुरुष ७६११२१
५. ग्रामीण लोकसंख्या १३५१३४६
६. शहरी लोकसंख्या २६३७२३
७. साक्षरता (एकूण) ११९९३९२
८. पुरुष साक्षरता ६१९०१२
९. स्त्री साक्षरता ५८०३८०
भूगोल :

पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सतारा, सांगली, कोल्हापूर व उत्तरेस रायगड जिल्हा अश्या जिल्ह्याच्या सीमा आहेत. पूर्वेला सह्याद्रीची रांग व पश्चिमेला समुद्र असा हा चिंचोळा, उभट आकाराचा, दक्षिणोत्तर पसरलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यास सुमारे १७० किमी. लांबीचा किनारा लाभला आहे.

खनिज संपत्ती :

जयेथे जांभा (लाल रंगाचा) दगड मोठ्या प्रमाणात सापडतो. त्याचबरोबर रांगोळी ज्या दगडापासून तयार केली जाते, तो शिरगोळा दगड राजापूर तालुक्यात सापडतो. मंडणगड व दापोली या तालुक्यात बॉकसाईटचे साठे सापडतात. याचबरोबर जिल्ह्यात फिनोलेक्स व जिंदाल औष्णिक उर्जा हे मोठे विद्यत प्रकल्प आहेत.

शेती :

भात हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पिक आहे. आंबा, फणस, काजू, नारळ, रातांबे व सुपारी हि जिल्ह्यातील प्रमुख फळपिके आहेत. मत्स्यशेतीचा विचार करता कोलंबीची शेती येथे मोठ्या प्रमाणावर केली जाते. जिल्ह्यातील सीट्रोनेला गवत प्रसिद्ध आहे. यापासून तेलाची निर्मिती केली जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील भाटे येथे नारळ संशोधन केंद्र कार्यरत आहे.

अं.क्र. हंगाम प्रमुख पिके
१. खरीप भात, नागली
२. रब्बी भाजीपाला पिके, कुळीथ, चवळी, पावटा, वांगी, मिरची कलिंगड
३. उन्हाळी भेंडी, काकडी, वाल
४. बागायती फळ पिके आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम
दळणवळण :

मुंबई-पणजी-कोची हा राष्ट्रीय महामार्ग १७ या जिल्ह्यामधून जातो. सातारा जिल्ह्याला जोडणारा कुंभार्ली घाट, रायगड जिल्ह्याला जोडणारा कशेडी घाट व कोल्हापूर ला जोडणारा आंबाघाट हे महत्वाचे घाट रत्नागिरी जिल्ह्यात आहे. कोकण रेल्वे प्रकल्पाला २०१२ मध्ये महत्वाकांक्षी १४ वर्षे पूर्ण होत आहेत. कोकण रेल्वे मार्गावर पानवल येथे आशियातील सर्वात उंच पूल आहे. करबुडे या अत्यंत दुर्गम ठिकाणी आशियायी खंडातील सर्वात मोठा ६ किमी. लांबीचा बोगदा आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत एकुण ९ पंचायत समिती आहेत त्याअंतर्गत एकुण ८५१ ग्रामपंचायती आहेत. या सर्व पंचायत समिती व ग्रामपंचायतमध्ये शासना मार्फत देण्यात आलेल्या संगणक व प्रिंटर सुस्थितीमध्ये आहेत.

जिल्हयातील नागरी प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था

जिल्हयातील नागरी प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था खालीलप्रमाणे आहेत.

अं.क्र. तपशील संख्या नावे
नगरपालिका खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर
नगर पंचायत मंडणगड, दापोली, गुहागर, लांजा, देवरुख
पंचायत समिती मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर(देवरूख), रत्नागिरी,लांजा, राजापूर
ग्रामपंचायत ८४६